पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. अखेर आज त्यांची ५७ वर्षी प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे.
भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन मतदान केलं. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत अत्यवस्थ असतानाही एम्ब्युलन्समधून जाऊन मतदान केलं होतं. प्रकृती ठिक नसताना आमदारांनी पुण्याहून मुंबईला येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. भाजपच्या फायटर आमदार म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.
मुक्ता शैलेश टिळक ह्या २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या.
मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले होते. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.
0 टिप्पण्या