वडगाव - भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या संघर्षमय इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण मावळ तालुक्यात 'हर घर तिरंगा' हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी इमारती, घरांवर ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून तिरंगा ध्वज उभारावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी केले आहे.
प्रत्येक घरावर, इमारतींवर ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन राष्ट्रध्वज उभारायचा आहे. यासाठी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी. हर घर तिरंगा या ऐतिहासिक उपक्रमात मावळ तालुक्यातील नागरिक म्हणून सक्रीय सहभाग नोंदवावा.
हर घर तिरंगा उपक्रम अंमलबजावणीकरिता प्रशासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
ज्याठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्चस्थानी आणि स्पष्टपणे दिसेल, अशा रितीने लावला पाहिजे. घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरबयाची आवश्यकता नाही. ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करुन ठेवावा.
या गोष्टींचे पालन करा-
प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.
ध्वज फाटलेला अथवा चुरगळलेला लावता कामा नये.
ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर, वरच्या टोकावर फुले-हार घालू नये.
इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा, राष्ट्रीय ध्वजाच्या लगतही नसावा.
ध्वजाचा स्पर्श जमीनीस होऊ नवे अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.
ध्वज फाटेल अशा पद्धतीने फडकवू नये अथवा बांधू नये.
ध्वज मलीन होईल अशा प्रकारे वापरु नये अथवा ठेवू नये.
ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नयेत.
अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा
0 टिप्पण्या