Ticker

6/recent/ticker-posts

व्यवहार माझे जबाबदार वाजे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती नेमकी अशीच आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी आणि ते मिळत नसल्याने आलेल्या क्रोधापायी ते आपला पूर्वेतिहास, परंपरा, संस्कार आणि आदर्श विसरले. अनेक चुकीच्या गोष्टींचं ते समर्थन करायला लागले. खंडणी, हत्या, अत्याचार याकडे काणाडोळा करण्याइतपत त्यांची संवेदना गोठली. यातच त्यांच्या आणि शिवसेनेच्या राजकीय सर्वनाशाची बीजं सामावलेली आहेत. सचिन वाझे प्रकरण ही महाआघाडीच्या शेवटाची सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल.

आगामी 25 वर्षं महाराष्ट्रात सत्तेवर राहण्याची गर्वोन्मत्त भाषा बोलणारं महाविकास आघाडीचं तीन चाकांचं सरकार वाझे प्रकरणावरून सध्या गटांगळ्या खात आहे. हे प्रकरण जर वाझेंपुरतंच मर्यादित असतं, तर  काकांनी ते केव्हाच गुंडाळलं असतं. पण या प्रकरणाची पाळंमुळं खूप दूरवर, कदाचित मातोश्रीपर्यंतही गेलेली आहेत. शिवाय संजय राठोडांमुळे झालेल्या बदनामीमुळे आणि मर्जीतल्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेत ‘बदले की आग’ धुमसत आहे. वाझे प्रकरण अंगावर शेकलं असल्याने शिवसेना सूडाचं निमित्त शोधत आहे. या प्रकरणाचा जास्तीत जास्त उपयोग करून शिवसेनेला आणखी जायबंदी करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे रोज नवे डाव टाकले जात आहेत. या दोन्ही पक्षांच्या दादागिरीत एखाद्या आश्रितासारखी अवस्था झालेली काँग्रेस मम म्हणण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना कमी निधी मिळत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात, पण तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्या - म्हणजेच राष्ट्रवादीच्या हातात असल्याने आणि एकूणच आर्थिक विषयावर काकांची काकदृष्टी असल्याने वेळोवेळी गळे काढण्याशिवाय काँग्रेस काहीच करू शकत नाही. काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की राहुल आणि सोनिया यांना दूषणं देऊन बाहेर पडलेल्या चाकोंना पवारांनी सोनियांच्या नाकावर टिच्चून दिल्लीत आणि तेही समारंभपूर्वक स्वपक्षात घेतलं, तरी काँग्रेसकडून नाराजीचा एक शब्दही ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे वाझे प्रकरणात दोन्ही मोठे भाऊ अडचणीत सापडल्यामुळे आपल्याला कसा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल, एवढाच बाळबोध विचार काँग्रेस करत आहे.

हे प्रकरण किती खोल आहे, याचा अंदाज शरद पवार सोडले तर सत्तेतल्या अन्य कुणालाही नसेल. त्यामुळे फटफजितीची पावती शिवसेनेच्या नावावर फाडून राष्ट्रवादीला वाचवण्याचा पवारांचा आटापिटा चालू आहे.

ज्यांना अडकवण्याचे मनसुबे तिन्ही पक्ष रोज रचत होते, ते देवेंद्र फडणवीस मात्र आपले हल्ले अधिकाधिक तीव्र करत आहेत. *“अकेला फडणवीस क्या करेगा”* हे वाक्य आपण का बोलून गेलो, असं सुप्रियाताईंना राहून राहून वाटत असेल.

महाभारतातला चक्रव्यूहाचा प्रसंग जरा डोळ्यापुढे आणा. डावपेचात तरबेज असलेल्या आणि सर्व आयुधांची माहिती असलेल्या द्रोणाचार्यांनी अर्जुनाला संपवण्यासाठी चक्रव्यूह उभा केला होता. त्यांच्याकडे अनेक रथी-महारथी होते, तो दिवस शंकराच्या वरप्राप्तीने एक दिवसासाठी अमर बनलेल्या जयद्रथाचा आहे, हे त्यांना माहीत होतं. पण अर्जुनाच्या बाजूने प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत, हे ते विसरले.

राज्यातल्या महाभारतातही  काकांनी सत्तेचा एक चक्रव्यूह उभा केला. त्याचं नेतृत्व नाइलाजाने ज्याच्याकडे द्यावं लागलं, तो अगदीच बुळा निघाला. सत्तेत भागीदार असताना खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याच्या वल्गना करणारा हा काडीपहिलवान नुसताच तोंडाचा वाघ आहे, हे ते ओळखून होते. कशीतरी हवा भरून त्यांनी त्याला उभं केलं. पण वर्षभरात चित्र इतकं बदललं की सगळे रथी-महारथी चक्रव्यूहात अडकले आणि ज्याला अडकवायचं, तो बाहेर उभं राहून रोज नवनवी आव्हानं उभी करत आहे.

वाझे प्रकरण हे त्यातलंच एक ताजं उदाहरण. चालत्या काळात केलेली पालथी कृत्यं पालथ्या काळात उरावर बसतात, असं म्हटलं जातं. वाझेंची कहाणी अशीच आहे. पोलीस सेवेतून निलंबित झालेल्या वाझे यांनी शिवबंधन बांधलं. शिवसेनेलाही असल्याच बेदरकार माणसाची गरज होती. साहजिकच वाझेची तिथं चलती होती. वाझेने तिथं काय काय केलं हे शोधून काढलं, तर अनेक गोष्टी बाहेर येतील. उद्धवकृपेने वाझेंचं पोलीस दलात पुनर्वसन झालं. मग तर काय, ते चौखूर उधळले. वाझेंचं सत्ताधीशांबरोबरचं कनेक्शन इतकं फिट बसलं की नवेनवे कारनामे करण्याची संधी त्यांच्याकडे दौडत यायला लागली.

मग वाझेंच्या अधिकाराच्या आणि संपत्तीच्या लोभाला उधाण आलं. अनेक गाड्यांसाठी आणि अगणित संपत्तीसाठी त्यानं कोणकोणती तंत्र वापरली असतील, ते त्याचं त्याला किंवा त्याच्या बोलवत्या धन्याला माहीत.

*● हेच ते परमबीर सिंग*

सध्या सुशांत राजपूत प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचं नाव खूप गाजलं. सर्वोच्च न्यायालयाने सणसणीत थपडा लगावल्या, तरी महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना परमबीर सिंग यांची आरती ओवाळण्यात कुठलीही कसर सोडत नव्हते.

हे परमबीर सिंग तेच अधिकारी आहेत, जे हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव बाँबस्फोटाची चौकशी करणार्‍या एटीएस पथकात होते. या पथकाने किती निर्घृण प्रकारे मारहाण केली, याची कहाणी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी रजत शर्मा यांच्या ‘आपकी आदालत’ या कार्यक्रमात सांगितली होती. अंगावर शहारे आणणार्‍या या कहाणीत त्यांनी त्या वेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंग यांचं नाव घेऊन त्यांनी कशी मारहाण केली होती याचं वर्णन केलं होतं.

‘आपकी आदालत’च्या या भागाची लिंक वाचकांसाठी देत आहे. या भागामध्ये 23व्या मिनिटाला हा उल्लेख आहे. साध्वींनी अतिशय स्पष्ट शब्दात ती करुण कहाणी सांगितली आहे. https://youtu.be/CgzsFCXFaVU

त्या वेळी साध्वींवर फुलं उधळून शिवसेनेने त्यांचं स्वागत केलं होतं. तीच शिवसेना आज परमबीर सिंगांवर फुलं उधळत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण उघडकीस आलं आणि सगळा देश हादरला. त्यातच मनसुख हिरेनचा संशयास्पद मृत्यू झाला आणि तीनचाकी सरकारच्या आसनाखाली जणू भूकंप झाला. ‘आमच्यात मतभेद नाहीत, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सगळं सुरळीत चालू आहे, कुणालाही पाठीशी घालणार नाही’ असं शक्य तितक्या बावळट चेहर्‍याने सर्वांनी सांगितलं, तर आत काय खदखदत आहे याची कुणालाच कल्पना येणार नाही असा या सत्तातुरांचा समज असावा. पण केंद्रीय तपास पथकाकडून एकापाठोपाठ एक अशा भानगडी बाहेर यायला लागल्याने आघाडीतल्या तिन्ही पक्षांचं धाबं दणाणलं. ज्यांच्या धास्तीने 80 वर्षांच्या योद्ध्याला वर्षभरापूर्वीच भर पावसात भिजावं लागलं होतं, त्याच फडणवीसांच्या धास्तीने या योद्ध्याला पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागलं. कारण ज्याच्या हातात तलवार दिली, तो आपण अगदीच बिनकामाचे असल्याचं सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पडला होता. त्याच्या अधोगतीची सुरुवात झाली ती पालघरला झालेल्या दोन साधूंच्या क्रूर हत्येने. आणि मग कोरोना हाताळणी, कायदा व सुव्यवस्था, दिशा सालियानची आत्महत्या, सुशांत सिंगचा वादग्रस्त मृत्यू, परराज्यात जाणार्‍या मजुरांची भोंगळ आणि बेशिस्त कारभारामुळे झालेली ससेहोलपट, अर्णवच्या अटकेमागची सूडाची कहाणी, दहा अर्भकांचा निष्काळजीपणामुळे झालेला जळून मृत्यू, पोलिओचा डोस म्हणून सॅनिटायझर पाजले जाण्याची बेपर्वाई, वयोवृद्ध राज्यपालांना विमानातून उतरवण्याचा बेमुर्वतपणा, पूजा चव्हाणच्या वादग्रस्त मृत्यूबाबतची अक्षम्य दडपादडपी, बदनाम मंत्र्यांना वाचवण्याचा निर्लज्ज खटाटोप आणि आताचं हे वाझे प्रकरण. सरकारचा पाय दर दिवशी अधिकाधिक खोलात रुतत आहे.

वाझे प्रकरण तर या सगळ्यावरचा कळस आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि पोलीस आयुक्तांचा ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास, तो टिनपाट पोलीस अधिकारी बनावट नंबरच्या गाड्या सररास वापरतो, त्यांचा उपयोग गुन्ह्यांसाठी करतो, पीपीई किट घालून दिशाभूल करतो, खोटी नोटिस देऊन सीसीटीव्ही रेकॉर्ड लांबवतो आणि सर्वात कहर म्हणजे थेट नोटा मोजण्याचं मशीन गाडीत ठेवून हिंडतो... एवढंच नव्हे, तर एका व्यक्तीच्या हत्येचा सर्वाधिक संशय त्याच्यावर घेतला जातो. मुंबई पोलिसांच्या कीर्तीला काळिमा जर कोणी फासला असेल, तर तो या वाझेने असंच म्हणावं लागेल.

भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेतलं तत्त्वज्ञान कालातीत आहे असं म्हटलं जातं. गीतेतील ‘क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृति भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती’ या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितलं आहे. क्रोध आणि मोह यामुळे स्मृतिभ्रंश होतो आणि त्यातून बुद्धिनाश होऊन अंतिमतः सर्वनाश होतो, असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सध्याची स्थिती नेमकी अशीच आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी आणि ते मिळत नसल्याने आलेल्या क्रोधापायी ते आपला पूर्वेतिहास, परंपरा, संस्कार आणि आदर्श विसरले. चुकीच्या अनेक गोष्टींचं ते समर्थन करायला लागले. खंडणी, हत्या, अत्याचार याकडे काणाडोळा करण्याइतपत त्यांची संवेदना गोठली. यातच त्यांच्या आणि शिवसेनेच्या राजकीय सर्वनाशाची बीजं सामावलेली आहेत. आता त्यांना सावरायला किंवा प्रसंगी कानउघाडणी करायला बाळासाहेबही नाहीत. त्यांच्या सर्वाधिक जवळ आहेत ते संजय राऊतांसारखे बुद्धिभ्रम करणारे किंवा शरद पवारांसारखे मतलबी नेते.

सचिन वाझे प्रकरण ही महाआघाडीच्या शेवटाची सुरुवात आहे असंच म्हणावं लागेल. गुन्हेगार एकटा-दुकटा जात नाही. तो त्याच्या सग्यासोयर्‍यांना घेऊन जातो. वाझेने या प्रकरणात पहिला बळी घेतलाय तो पोलीस आयुक्त परमबीर यांचा. ही वाट आता कुठपर्यंत पोहोचते, ते पाहायचं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या