मावळ - सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीने दुर्गसंवर्धनाच्या एका मोठ्या महायज्ञाला सुरवात होत आहे या अंतर्गत किल्ले तुंग ( कठीणगड ) किल्याच्या विकासाची योजना आखली आहे.
मावळाला लाभलेल्या निसर्गात गड-किल्ल्यांचे महत्त्व फार आहे पण त्याच मावळात अनेक असे गडकिल्ले आहेत जे अजून संपूर्ण दुर्लक्षित आहेत त्यातील एक म्हणजेच तुंग उर्फ कठीणगड हा किल्ला. सध्या जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांना घरी बसावे लागले होते, संवर्धन करण्यासाठी हाती घेतलेले काम थांबावावे लागले होते.
कोरोणाचे संकट थोडं कमी झाल्याने आपण सर्व नियम पाळून किल्याच्या नवसंजीवनी मोहिमेस सुरवात करत असुन, पहिल्या टप्यातील कामासाठी लागणारे दगड घडवण्याचे कामे चालू झाले आहे. किल्ल्यावरील सर्व वास्तूंना पुनरवैभव प्राप्त करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने किल्ला पुन्हा चांगल्या स्थिती मध्ये उभा करण्यास शुभारंभ करत आहे.
मावळ तालुक्यातील किल्ले तुंग उर्फ कठीणगडावर गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सह्याद्रीच्या दुर्ग सेवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून काम केले आहे जसे कि गणेश मंदीरचे छत, दिशादर्शक व माहिती फलक आणि २०१७ साली गडावर संस्थेच्या माध्यमातून सागवणी दरवाजा देखील बसवण्यात आला आहे, अतिशय देखणा असलेला हा किल्ला अनेक वास्तू आपल्या उदरात ठेवून आहे त्याची अनुभूती आम्हाला कायम जाणवते, याच गडावरील वास्तूंचे जतन, संवर्धन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान झटत आहे,
दुर्ग संवर्धन हे नाव घेतले, ऐकले किंवा वाचले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते एखाद्या गडाचे चित्र किंवा एखादी वास्तू. मूळात संवर्धन करणे किंवा संवर्धन या शब्दाची फोड करायचे म्हटले तरी त्याचा अर्थ वर वर सोपा वाटत असला तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे, दुर्ग संवर्धन हे कार्य एका दिवसाचे किंवा एका वर्षाचे नसून ती सातत्याने चालणारी तसेच फक्त भावनिक नजरेने न पाहता त्याचा अभ्यास करून त्याची माहिती आणि महत्त्व जाणून घेणारी कार्यप्रणाली होय...ह्याच कार्यप्रणालीचे तंतोतंत पालन करून आणि पुरातत्व विभागच्या मार्गदर्शनाने आपण तुंग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान मावळ विभागाच्या वतीने संवर्धनाच्या कामाला सुरुवात करत असुन त्यामध्ये प्रामुख्याने पुढील कामे करण्यात येणार आहे..
१ ) तीन टप्प्यांत पायऱ्या करण्यात येणार आहे
२ ) रेलींग ( लोखंडी कठडे )
३ ) पहिला दरवाजा बसवणे
४ ) गणपती मंदिर जीर्णोद्धार
५ ) तुंग देवी मंदिर जीर्णोध्दार
६ ) पाण्याच्या टाक्यानां संरक्षक कठडे व जाळी बसवणे
७ ) दिशादर्शक व माहिती फलक बसवणे
सह्याद्रीचे दुर्ग सेवक गेली बारा वर्षे म्हणजेच एक तप या गडकोटांची सेवा करत आहे आपल्या घरदार, नोकरी-व्यवसाय सांभाळून प्रत्येक जण अगदी तन-मन-धन अर्पून हे कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे, आपल्या राजांचा इतिहास जपण्यासाठी आज आणि हात झटत आहेत गरज आहे त्यांच्या हाताला हात लावायची आणि आर्थिक सहकार्याची म्हणजे दुर्ग संवर्धन मोहिमेला व्यापक स्वरुप प्राप्त होईल आणि किल्ल्यांचे हरवलेले सौंदर्य पुन्हा बहरेल..पुन्हा हे किल्ले खऱ्या अर्थाने जागते व्हावे.. काहीजण वाढदिवसाचा खर्च टाळून दुर्ग संवर्धनासाठी मदत करत आहे. आपन मदतीचा हात पुढे केला तर हे कार्य पुढे चालु राहील या साठी मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
निधी संकलन साठी: गुगल पे / फोन पे उपलब्ध
0 टिप्पण्या