Ticker

6/recent/ticker-posts

राजगुरुनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने मानद पशु कल्याण अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.....

*राजगुरुनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने मानद पशु कल्याण अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.....*
 राजगुरुनगर : दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी एका संशयित गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी हल्लेखोरांनी सापळा रचून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे शिवशंकर स्वामी यांना पोलीस संरक्षण असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी चार जण नामे खालीद गुलाम गौस बेपारी, मोहम्मद शेख खालीद बेपारी, फैजल निसार कुरेशी, यासीर निसार कुरेशी यांना अटक केली होती. या गुन्ह्यातील दोघे अद्याप फरार असून त्यांना अटक करणे बाकी आहे. 
याप्रकरणी वरील चारही आरोपींनी राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी झालेल्या सुनावणीच्या प्रसंगी आरोपीच्या वकिलांनी आरोपी निर्दोष आहेत तसेच पोलिसांनी खोट्या स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर यापूर्वी कुठलीही गुन्हे दाखल नाहीत. तपास पूर्ण झालेला आहे कुठलाही रिकवरी किंवा डिस्कवरी चा भाग राहिलेला नाही त्यामुळे आरोपींना जामीन देण्यात यावा अशी मागणी केली होती.
 उलटपक्षी पोलिसांनी सदर जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता. या आरोपींच्या जामिनाला विरोध करताना पोलिसांनी या आरोपींवर यापूर्वी जनावरे कत्तलीचे गुन्हे दाखल असल्याचे देखील त्यांच्या युक्तिवादात नमूद केले. तसेच आरोपी जामिनावर सुटल्यास ते साक्षीदारांवर फिर्यादीवरून दबाव आणू शकतात असेही पोलिसांनी नमूद केले होते.
फिर्यादी स्वतः त्यांचे वकील ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे यांच्यामार्फत न्यायालयासमोर हजर झाले त्यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर दाखल करून जामिनाला विरोध नोंदवला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.रजनी नाईक यांनी सरकार पक्षाची बाजू मांडताना आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. उलटपक्षी  फिर्यादी हा मे. उच्च न्यायालयाने नेमलेला मानद पशु कल्याण अधिकारी आहे. तो स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवेचे काम करत आहे असे नमूद केले.
या सर्वाचा सारासार विचार करून न्यायालयाने आज आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्ज फेटाळताना तपास सुरू आहे तसेच गुन्हा करण्यामागे आरोपींचा उद्देश हा स्पष्ट होत आहे. त्यामुळे या स्टेजला जामीन अर्ज मंजूर करता येणार नाही असे मे. न्यायाधीश ए. एन. आंबळकर यांनी दिलेल्या निर्णयात स्पष्ट नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या